उल्हासनगर : वर्षभरापूर्वी कॅम्प नं-३ येथील मेमसाहेब इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित फ्लॅटचा मालक नवीन मोटवाणी याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी बाजारातील मेमसाहेब इमारतीच्या फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये विनापरवाना दुरस्तीचे काम सुरू होते. ३ फेबु्रवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास इमारतीमधील फ्लॅट क्रमांक २०२ चा स्लॅब डॉ. ब्रिजलाल राजवानी यांच्या क्लिनिकवर पडून उपचारासाठी आलेले ७५ वर्षीय नीतू सारिजा, ३५ वर्षीय अनिता मोर्य आणि दीड वर्षांची प्रिया मोर्य यांचा जागीच मृत्यू झाला. हिराबाई खानचंदानी, खुर्शी मोर्य आणि वंदना मोर्य हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटना होऊन एक वर्ष उलटल्यानंतर डॉ. राजवानी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फ्लॅटमालक नवीन मोटवाणी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगरात एका वर्षात २० पेक्षा जास्त इमारतींचे स्लॅब पडून अनेकांचा मृत्यू, तर शेकडो जण बेघर झाले आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर राज्य शासनाने याबाबत दखल घेतली. शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी २००६ मध्ये काढलेल्या अध्यादेशात काही बदल करून धोकादायक इमारतींचा समावेश करण्यात आला. या इमारतींच्या विकासासाठी शासनाने पाच चटईक्षेत्र (एफएसआय) दिले. बांधकामे नियमित करण्यासाठी आॅनलाइन प्रक्रियाही महापालिकेने सुरू केली. त्यानुसार, १५०० पेक्षा जास्त नागरिकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. आॅनलाइन प्रक्रियेस नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
धोकादायक इमारतीवर चालणार हातोडा
महापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची संख्या १५० च्या पुढे आहे. वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक इमारत पडल्यास, वित्त तसेच जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा ठराव पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे.