लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/कल्याण/भिवंडी : दोन आठवड्यांहून विलंबाने दाखल झालेल्या पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शनिवारी रात्रीपासून तडाखेबंद हजेरी लावली. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रस्ते पाण्याखाली गेले आणि सखल भागही जलमय झाले. सर्व महापालिका, नगरपालिकांनी नालेसफाईबाबत केलेल्या दाव्यांचा या पावसाने फज्जा उडवला. भिवंडी तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेल्याने २० गावांचा संपर्क तुटला.पावसामुळे नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले, तर नद्या काही काळातच सांडपाण्यासह दुथडी भरून वाहू लागल्या. डोंबिवली परिसरात सकाळी पावणेदहाच्या सुमारास वीज कडाडल्याच्या प्रचंड आवाजाने शहरवासीयांची दाणादाण उडवली. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांत रेल्वेरूळांत पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. कळव्यात तर रूळ पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक वळवावी लागली. हे पाणी साचण्यास पालिकांची अपुरी नालेसफाई कारणीभूत असल्याचा आरोप रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. नालेसफाई अपुरी झाल्याने, त्यातील गाळामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर पसरले. सखल भागातील घराघरांत शिरले. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याची घोषणा महापालिकांनी केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाल्यांत अडकलेला जास्तीत जास्त कचरा प्लास्टिकचा असल्याचे दिसून आले. तसेच या सर्व शहरांच्या वेगवेगळ््या भागात साठलेला कचरा वेळेत उचलला न गेल्याने तोही नाल्यांत वाहून गेला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी नाले बुजवून आपली दुकाने थाटल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे स्वामी समर्थ मठाचा परिसर गुडघाभर पाण्याखाली गेला होता. भिवंडी तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले असून वीस गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या चोवीस तासांत भिवंडीत सर्वाधिक २०५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे वाडा तसेच वसई परिसराला जोडणारे तीन पूल पाण्याखाली गेले आणि अवचीतपाडा, निंबवली, गोराड, कलभोण व गणेशपुरीसह छोट्या-मोठ्या वीस गावांचा संपर्क तुटला. या पावसाने शेतकरी सुखावले तरी वाडा व वसईच्या बाजारात नियमीत जाऊन दुध,भाजीपाला विक्री करणारा शेतकरी गावातच अडकून पडल्याने तो शहरापर्यंत पोचू शकला नाही. या गावांपर्यंत महसूल विभागाचे अधिकारीदेखील संध्याकाळपर्यंत पोचू शकले नाहीत. ग्रामस्थ हा दावा करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र रात्री उशिरा गावांशी संपर्क तुटला नसल्याचे जाहीर केले. संबंधित बातम्या आतील पानांत
नालेसफाईचा पुरता फज्जा
By admin | Published: June 26, 2017 1:34 AM