मोहोपाडा : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वानिवली गावाजवळ पाच महिन्यांपासून फ्लिपकार्ट कंपनी सुरू आहे. या कंपनीत ७५० कामगारांना अचानक कमी करण्यात आले आहे. कंपनीत कामगारांची भरती झाल्यानंतर त्यांना अकरा महिन्यांच्या करारानुसार घेण्यात आले होते. मात्र, त्याआधीच त्यांना काढून टाकले.२१ ते २८ नोव्हेंबरपर्यंत अचानक कंपनीतून एकूण ६०० कामगारांना कमी केले गेले, तर ३० नोव्हेंबरला पुन्हा १५० कामगारांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी केले. याकरिता मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना परत कामावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मनसेच्या वतीने फ्लिपकार्ट व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, ही चूक नेमलेल्या ठेकेदारांची असून, त्यात कंपनीचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. कामगारांना न्याय देण्यासाठी पनवेलच्या कामगार उपायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. न्याय न मिळाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला.फ्लिपकार्ट कंपनीतून कामगार कपात होत असल्याने कामगारांत असंतोषाचे वातावरण आहे. काहींनी बँकेतून कर्ज घेऊन दुचाकी घेतल्या आहेत, तर काही कुटुंबातील जबाबदार नागरिक असल्याने घरखर्च कसा चालवायचा, या चिंतेत आहेत. कामावरून कमी केलेल्या कामगारांमुळे कंपनीबाहेर शुक्रवारी छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी खालापूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फ्लिपकार्ट कंपनीतून ७५० कामगारांना केले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 5:03 AM