लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास नद्यांना गुरुवारी पूर आल्याने नदीकाठच्या गावांत पाणी शिरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर टिटवाळा शहरातील काही गृहसंकुलांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खडवली येथील भातसा नदीला पूर आल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने खडवली-पडघा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच या पुरामुळे खडवली नदीकाठच्या इंदिरानगर, ज्यू, आदिवासी आश्रम शाळा परिसर, स्वामी समर्थ मठ परिसर येथील घरांत पाणी शिरले आहे. रात्री २ वाजता झोपेत असताना पाणी शिरल्याने त्यामुळे लोकांना घरातून बाहेर काढता आले नाही. मात्र, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूलही बुधवारी रात्रीपासूनच पाण्याखाली आहे. यामुळे लगतच्या १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच काळू नदीवरील गुरवली व वासुंद्री येथील पूलही पाण्याखाली गेल्याने येथील लगतच्या ९ ते १९ गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
दुसरीकडे टिटवाळा रेल्वस्थानक ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर शिव मंदिरालगत असणाऱ्या पुलावरून काळू नदीचे पाणी गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. डीजी-वन शोरूमपर्यंत पुराचे पाणी शिरले आहे. टिटवाळा मंदिर परिसरातील लोक पलीकडे, तर स्थानिक परिसरातील लोक अलीकडे अडकून पडले होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने येथील नारायणनगर रोडवर असणाऱ्या गणेश कृपा चाळीतील २५ घरे पाण्याखाली आहेत; तर सांगोडा रोड येथील २०० खोल्या पाण्याखाली गेल्या. तसेच येथील एका मोठ्या गृहसंकुलातील काही इमारतींच्या पार्किंग परिसरात व क्लब हाऊसमध्येही पाणी शिरले. तसेच गायत्री धाम सोसायटीच्या तीनही फेजमधील तळमजल्यावरील घरांत छतापर्यंत पाणी शिरले होते. लगतच असणाऱ्या म्हाडाच्या १२ घरातदेखील छतापर्यंत पुराचे पाणी शिरले होते. टिटवाळा स्थानकातील रेल्वे रूळांमध्ये पाणी असल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली होती. या ठिकाणी पोलीस, नागरिक व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते लोकांना मदतीचा हात देताना दिसत आहेत.
--------------