शहापूर : गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूर तालुक्यात बाजारपेठेत, अनेकांच्या घरात, गावागावांत पाणी साचल्याने तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने परिसरात वाहतूक ठप्प झाली होती, तर आसनगाव, शहापुरात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे एकूणच तालुकावासीयांचे जीवन विस्कळीत झाले होते.
सापगाव गावातील भातसा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. आसनगाव आणि शहापुरातील काही भागात पाणी शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत वितरण कंपनीने तेथील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना रात्र अंधारात काढावी लागली. शहापूरची भारंगी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने बाजूला असलेल्या गुजराथीबाग आणि गुजराथी नगर परिसरात पाणी शिरले होते. तालुक्यातील अल्याणी गावात यंदाही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दरवर्षी या गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडतो. हे गाव पूरसदृश गाव जाहीर करा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
-------------
तालुक्यातील अल्याणी - नांदवळ गावात काळू नदीचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. लेनाड येथील पाच घरे पाण्याखाली गेली असून, तेथील कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले तर शहापूरलगत असलेल्या वाफे पाडा येथील सत्यधाम आश्रमाची वाताहत झाली आहे. भारंगी नदीला आलेल्या पुरामुळे येथील पत्र्याचे शेड कोसळले असून, गोशाळेतील गायींचा खाणा व चारा पूर्णतः भिजून गेला आहे. शेरे पाडा येथील काळुराम शेरे या शेतकऱ्याचा एक बैल काळू नदीत वाहून गेला तर एका गायीला वाचविण्यात त्यांना यश आले.
सापगाव येथील पुलावरील दोन्ही बाजूचे रेलिंग उद्ध्वस्त झाले आहे. सुरक्षितता म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याने पुलापलीकडील शेणवा, डोळखांब, किन्हवली व मुरबाड रस्त्यावरील सुमारे १५० गावांचा शहापूरशी संपर्क तुटला आहे. यांसह डोळखांब - चोंढे मार्गावरील मोरी, वरस्कोळ - कुंभ्याचापाडा मार्गावरील मोरी, टेंभा - वाडा मार्गावरील बेलवडजवळील मोरी वाहून गेल्याने या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.