डोंबिवली- अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातील संपूर्णदिवा व आयरे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास दिवा विभागात ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी शिरले. या परिसरात प्रचंड अतिवृष्टी होत असताना बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होवू लागल्याने पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व संपूर्ण दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण संपूर्ण परिसर जलमय झाला होता.
सुमारे सात ते आठ फुटांपर्यंत पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने दिव्यातील संपूर्ण परिसरातील चाळी, दुकाने व घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. त्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळण्याचा विषय लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १५ हजार रुपये व ज्या व्यक्तींचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असेल त्या व्यक्तीला नवीन मीटर बसवून देण्यात येईल याकरिता मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
दिवा विभागातील बेडेकर नगर, म्हसोबा नगर, वक्रतुंड नगर, ओमकार नगर, बी आर नगर, सुरेश नगर, श्लोक नगर, शिवशक्ती नगर, सदाशिव दळवी नगर, दातिवली, सिद्धिविनायक नगर, विकास म्हात्रे गेट, दिवा आगासन रोड, तिसाई नगर, टाटा पॉवर लाईन, विठ्ठल रखुमाई नगर, मुंब्रादेवी कॉलनी, बेतवडे, म्हातार्डी, आगासन, डी जी कॉम्प्लेक्स, नॅशनल शाळेजवळ, डम्पिंग परिसर, यशवंत नगर, साबेगाव, कोकणरत्न, विष्णू पाटील नगर, दिवा बंदर आळी, एन आर नगर, नागवाडी तसेच आयरे विभागातील सुमारे एक हजार चाळींमध्ये त्याचप्रमाणे , पलावा, भोपर व संपूर्ण कल्याण ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. या प्रंचड पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये जीवनावश्यक तसेच इतरही अनेक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.
यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी संपूर्ण दिवसभर दिवा विभागात तळ ठोकून संपूर्ण परिसरातून बोटीतून बचावकार्यात भाग घेतला होता. प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ व टीडीआरएफ जवान तसेच महानगरपालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यासह स्वतः मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तसेच पूरग्रस्तांना निवारा तसेच जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे तसेच नुकसान भरपाईचे पंचनामे देखील सुरु करण्यात आले आहेत. मात्र दिवा, आयरे, पलावा, भोपर तसेच मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी पाणी भरून नुकसान झाले अशा पूरग्रस्ताना तातडीची आर्थिक मदत मिळण्याकरिता आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे व पालकमंत्र्याकडे मागणी केली असून आज मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई देण्यासाबंधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १५ हजार रुपये व ज्या व्यक्तीचे वीजमीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असेल अशा व्यक्तीला नवीन वीजमीटर बसवून देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.