अंबरनाथ : बदलापूरमध्ये पुरात बाधित झालेल्या नागरिकांना अद्याप शासनाची कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांनी दहा दिवसांत मदत वर्ग होईल, अशी माहिती दिली आहे.
अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात उल्हास नदीकिनारी असलेल्या नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना अजूनही मदत न मिळाल्यानं नागरिकांनी लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली आहे.
बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यानंतर पूरग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले होते. मात्र अद्यापही या नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पुराचे पाणी बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा परिसरातील नागरी वसाहतीत शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन दोन महिने झाल्यानंतर अद्यापही नागरिकांना भरपाई मिळाली नाही. याबाबत नायब तहसीलदार संभाजी पवार यांना विचारणा केली असता शासनाकडून ७६ लाख रुपये मंजूर झाले असून सध्या पूरग्रस्तांच्या याद्यांची दुरुस्ती सुरू आहे. काही दिवसांत पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संभाजी पवार यांनी दिली आहे.