उमेश जाधव, टिटवाळा-: गेले कित्येक दिवसापासून कल्याणडोंबिवली महापालिका परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिका परिसरात ठिकठिकाणी पूराचे पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात उंदीर, घुशी, गायी, म्हशी या सारख्या जनावरांचे मलमुत्र विसर्जीत होऊन लेप्टोस्पायरोसिस या आजाराची लागवण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्राच्या स्तरावरून महापालिका परिसरातील नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डॉक्सीसायक्लीन गोळयांचे वाटप करण्यात येत आहे.
सध्याचे बदलते वातावरण व पूरपरिस्थिती लक्षात घेता उदभवणा-या जलजन्य, किटकजन्य व स्वाईन फलू या आजारांचा प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महापालिकेमार्फत आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील १९,४९३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका परिसरातील टिटवाळा शहारासह विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करुन ३८,९८६ डॉक्सीसायक्लीन गोळयांचे वाटप करण्यात आले असून ही कार्यवाही यापुढेही नियमित स्वरुपात करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, साचलेल्या पाण्यामधून शक्यता रहदारी टाळावी, तसेच गरज असेल तर, पायात गमबुटांचा वापर करावा. महापालिकेच्या रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्सीसायक्लीन गोळया मोफत उपलब्ध असून ज्या नागरिकांना साचलेल्या पाण्यात रहदारी करावी लागत असते अशा नागरिकांनी महापालिकेच्या रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्र येथून गोळया प्राप्त करुन घ्याव्यात.
बहुतांश भागात पाणी साचण्याचा समस्येमुळे पिण्याच्या पाण्यात दुषीत पाणी मिसळल्याने जलजन्य आजारांचाही धोका उदभवू शकतो. तरी, सर्व नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच वातावरणातील तापमानाच्या बदलामुळे स्वाईन फलूची लागण होण्याची शक्यता असल्याने ज्या नागरिकांना सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.
त्याचप्रमाणे, कोणताही ताप अंगावर न काढता त्वरीत नजीकच्या डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावेत व डॉक्टरांच्या सल्याने त्वरीत रक्त तपासणी करावी व औषधोपचार सुरु करावा, असेही आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. सततच्या पर्जन्य वृष्टीमुळे होणा-या आजारांच्या प्रार्दुभाव टाळण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व प्रभागातील विशेषतः अतिवृष्टीमुळे/पुराच्या पाण्याने बाधित परिसरात भूमीगत गटारामध्ये स्प्रे पंप, मल्टी जेट मशिनद्वारे जंतूनाशक फवारणी व धुरीकरण करण्याची विशेष मोहिम सध्या पूरसदृश्य भागात राबविण्यात येत आहे.