राजेश जाधव : लोकमत न्यूज नेटवर्क
म्हारळ : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला गुरुवारी पुराचा तडाखा बसल्याने तेथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. म्हारळ, वरप, कांबा येथील पूर शुक्रवारी ओसरला असला, तरी आता रोगराईची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी ग्रामस्थांची दमछाक होत आहे.
पुराचे पाणी अनेक गावांत शिरल्याने कल्याण-मुरबाड-नगर महामार्गाबाबत अनेक गावांचा संपर्क तुटला होता. म्हारळ, वरप, रायता, आणे, भिसोळ, कांबा, पावशेपाडा आदी गावांना पुराचा फटका बसला. म्हारळ येथे सखल भागांमध्ये पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने बैठ्या चाळींमधील घरे पाण्याखाली गेली. शिवानीनगर, म्हारळ सोसायटी, बोडके चाळ, अण्णाभाऊ पाटीलनगर, राऊत चाळ आदी भाग पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांच्या घरांतील जीवनाश्यक वस्तू पुरात खराब झाल्या. पुरात घरांचे नुकसान झाल्याने शासकीय मदत तातडीने मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
कांबा येथील मोरयानगर संपूर्ण बुडाल्याने तेथील तीनशे ते चारशे नागरिकांवर डोंगरच कोसळला आहे. पुराच्या पाण्यात वावरताना पायाला इजा झाली आहे. तसेच एकूणच रोगराई पसरण्याची भीती अश्विन अहिर याने व्यक्त केली. तेथेच राहणारे जोगिंदर गुप्ता म्हणाले, वीज नाही, पाणी नाही. खाण्यापिण्यासही काही नाही. त्यामुळे आता जगायचे कसे, या विवंचनेत आम्ही असल्याचे त्याने सांगितले.
अतिपावसामुळे म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा आदी कल्याण ग्रामीण उपविभागातील वीजपुरवठा सुरक्षेसाठी खंडित केल्याने ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले.
नुकसानीचे उद्या होणार पंचनामे
शासकीय मदतीसाठी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी संपर्क साधला असता पूरग्रस्त ठिकाणांची शनिवारी पाहणी करून पंचनामे करणार असल्याचे सांगितले.
---------------