कल्याण : देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढल्याने कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या भाडेवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे व्यावसायिक नाट्यसंस्थांसह सामाजिक, शैक्षणिक संस्थांना जादा दर मोजावे लागतील. सावित्रीबाई फुले कलामंदिर २००७ मध्ये सुरू झाले. त्याची भाडेवाढ १० वर्षांनी झाली आहे, तर आचार्य अत्रे रंगमंदिर २००१ मध्ये सुरू झाले आणि १० वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये त्याचे भाडे माफक वाढवण्यात आले. त्यानंतर, सात वर्षांनी ही भाडेवाढ होते आहे.राजकीय पक्षांकडून शैक्षणिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे मोफत कार्यक्रम होतील, त्यांना या भाडेदरात काही प्रमाणात सवलत देण्याची उपसूचना मान्य करण्यात आली. नाट्यगृहाच्या भाडेवाढीवर मुंबई नाट्यनिर्माता संघाने नाराजी व्यक्त केली आहे.दोन्ही नाट्यगृहांतील विविध कार्यक्रमांचे दर ठरवण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिने भाडेवाढीचा नवा अहवाल तयार केला. त्यावर फारशी चर्चा न होता तो मंजूर झाला. शिवसेनेचे नगरसेवक दशरथ घाडीगावकर यांनी राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांच्या भाडेदराला हरकत घेतली. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी होणाºया मोफत कार्यक्रमांना सवलतीत नाट्यगृह उपलब्ध व्हावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा कार्यक्रमांसाठी २० हजार रुपये आकारण्याचा निर्णय समितीने घेतला होता. मात्र, ते भाडे आता १० हजार करण्यात आले.नाट्यगृह सुरू झाल्यापासून कोणतीही भाडेवाढ झालेली नसल्याकडे लक्ष वेधत देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च पाहता भाडेवाढ ही अपरिहार्य असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले होते. प्रशासनाने सुचवलेल्या दरातील बदलानुसार नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाने सादर केला, त्याला एकमताने मान्यता देण्यात आली.>असे असतील नवे दरसरकारमान्य शाळा आणि विनाअनुदानित शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता १० हजार रुपये मोजावे लागतील. खाजगी शाळांसाठी हे भाडे १२ हजार रुपये असेल. प्ले ग्रुप, नर्सरी, अंगणवाडी यांच्या कार्यक्रमांसाठी १४ हजार घेतले जातील. तर, पालिका हद्दीबाहेरील संस्थांसाठी १५ हजार भाडे असेल. सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे यांच्याकडून १८ हजार भाडे आकारण्यात येईल. सामाजिक, शैक्षणिक संस्थेला नवीन दरानुसार १८ हजार रुपये आकारण्यात येणार आहे. व्यावसायिक बालनाट्यासाठी चार हजार, तर महापालिका क्षेत्रातील हौशी बालनाट्यासाठी २५०० रुपये भाडे मोजावे लागेल. नृत्य, गायन, वादन स्पर्धेच्या कार्यक्रमांसाठी सर्व प्रकारच्या संस्थांना १५ हजार रुपये भाडे ठरवण्यात आले आहेत. पालिकेच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी कोणतेही भाडे आकारण्याचा यात उल्लेख नाही. नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रायोगिक नाट्यसंस्था, नाट्य परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमांसाठी तीन हजार, रंगीत तालमीसाठी १५०० रुपये, केडीएमसी कर्मचाºयांच्या पदोन्नती, सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी मुख्य हॉल चार हजार रुपये, कॉन्फरन्स हॉलमधील साखरपुडा, वाढदिवस या कार्यक्रमासाठी पाच हजार रुपये भाडे ठरवण्यात आले आहे.
फुले, अत्रे नाट्यगृहांची भाडेवाढ मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 3:27 AM