मीरा रोड - अनधिकृत बांधकामांची व गडबड घोटाळ्यांची बजबजपुरी ठरलेल्या मीरा भाईंदर महापालिकेत दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामे करू देण्याचा घोटाळा जोरात सुरू आहे. दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासह नव्याने त्या आड अनधिकृत बांधकामे करण्यास मीरा भाईंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी मोकळीक दिली असल्याचा सवाल केला जात आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत जुन्या वा कमकुवत झालेल्या तसेच सखल झाल्याने पाणी भरत असतं असल्याच्या आड अनधिकृत बांधकामांना अधिकृत दुरुस्त्या परवानग्या महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग अनेक वर्ष देत होता. सदर बांधकाम परवानग्या देण्यात मोठा भ्रष्टाचार वगैरे प्रकार चालत असल्याचे आरोप होत होते. त्यानंतर नुकताच दुरुस्ती परवानग्या देण्याचे अधिकार आता सहा प्रभाग अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
परंतु या दुरुस्ती परवानगीच्या आड व्यवसायिक गाळे व व्यवसायिक बांधकाम धारक नव्याने वाढीव अनधिकृत बांधकामे करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. वास्तविक दुरुस्ती परवानगी देताना हे बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत याची कोणतीच खातरजमा केली जात नाही. दुरुस्ती परवानगी च्या आड अनधिकृत बांधकामांना नव्याने वाढीव अनधिकृत बांधकाम करण्यास महापालिकेने मोकळीक दिलेली आहे. दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली सर्रास नव्याने अनधिकृत बांधकामे केली जात असून त्याची उंची सुद्धा बेकायदेशीरपणे वाढवली जात आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी व आरोप होऊन देखील अनधिकृत बांधकामांना दुरुस्तीच्या नावाखाली अधिकृतपणाचे संरक्षण कवच देण्याचे काम महापालिका करत आहे. वास्तविक दुरुस्ती परवानगी देण्याचा अधिकार सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रभाग अधिकारी यांना कायद्याने आहे का हाच मोठा प्रश्न आहे.