अंबरनाथ- दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत देण्यात येत असल्याने नागरिकांनी हे साहित्य घेण्यासाठी लांबच लांब रांग लावली होती. साहित्य खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता नागरिकांना महागाईचा किती फटका बसला आहे याचे चित्र दिसत होते. साहित्य स्वस्त मिळते हे पाहुन नागरिक गर्दी करित असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजकांच्या कामाची स्तुती केली.
दिवाळी तोंडावर असल्याने गोर गरिबांनादेखील या दिवाळीचा गोडवा चाखता यावा यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शहरातील गोर गरिब कुटुंबियांना बाजारातील महागडे फराळ तयार करण्याचे साहित्य विकत घेण्याची गरज पडू नये, यासाठी शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी खुंटवली शिवसेना शाखेत 60 टक्के कमी दरात फराळ तयार करण्याचे साहित्य वाटप केले. 60 रुपये किमतीचे साहित्य अवघ्या 250 रुपयांमध्ये देण्यात येत असल्याने हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी एक किमी पर्यत रांग लावली होती. काही महिलांनी वाटप सुरू झाल्यावर साहित्य संपेल या भितीने पहाटेपासुन रांग लावली होती.
शहरातील गरिब कुटुंबियांना साहित्य कमी पडू नये यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक साहित्यांचा संच देण्यात आला. सकाळी या फराळ साहित्यांचे वाटप खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. वाटपाच्या ठिकाणी गर्दी होणं अपेक्षित असल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना 5 - 5च्या गटात सोडण्यात येत होते. त्यामुळे वेळेत सर्व साहित्याचे वाटप पूर्ण करण्यात आले. शिवसेनेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता नागरिकांना दिवाळीत शिवसेनेने चांगली भेट दिली अशी प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी दिले. नागरिकांची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पुढच्या वेळेच संपूर्ण शहरात अशा प्रकारे मोहिम राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला शहर प्रमुख अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, नगरसेविका मनिषा वाळेकर,विजय पवार,प्रदिप पाटील, माजी सभापती सदाशिव पाटील, सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाते.