नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ७ ) शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हा उड्डाणपूल ११ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी पर्यंत साधारणतः ११३ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी काढलेल्या अधिसूचनेत नमूद केले होते. मात्र त्यानंतर दोन दिवस व्यवस्था होऊ न शकल्याने अखेर दोन दिवस उशिराने उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकामामुळे पुला खालील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास होत आहे. मागील दोन महिन्यांपासून या वाहतूक कोंडीचा त्रास शहरातील नागरिक व प्रवासी सहन करत होते.
या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भिवंडी महापालिकेने त्यावेळेस ट्राफिक वार्डनची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. मात्र आता उड्डाणपुलाचा काम पूर्णत्वास येत असतांनाच महापालिकेने उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वार्डनच्या नेमणुकीसाठी तब्बल १६ लाख ३४ हजार १७० रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचे काम सुरु झाले त्यावेळेस या निविदा काढणे गरजेचे होते, मात्र उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असतांना महापालिकेने आता ट्राफिक वार्डनची निविदा काढणे म्हणजे भिवंडी महापालिकेचा अजब तुझे सरकार अशी टीका मनपा प्रशासनावर होत आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनाने अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यां वर कारवाई करण्याची गरज असतांना त्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील नागरिक करीत आहेत.