भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा स्वखर्चाने मुलामा देऊन पाणी शेतात घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तालुक्यातील भातसा धरणातून शहापूर, भिवंडी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उन्हाळ्यात पाणी दिले जाते. मात्र आज शहापूर तालुक्यातील शेकडो एकर शेती ही पाण्याविना ओसाड पडली असून या शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या चाऱ्या या निकामी झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत जात नसून ते जमिनीतच मुरते किंवा त्या तुटलेल्या चाऱ्यामधून इतरत्र निघून जाते. जागेवरच पाणी साठत असल्याने शेकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळतच नसल्याने दुबार शेतीचे प्रमाण कमी होत आहे.
आपल्या शेतापर्यंत पाणी येण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता स्वखर्चाने त्यावर प्लास्टिकची ताडपत्री टाकून आपल्या शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयत्न दहागाव येथील शेतकरी करीत असून तालुक्यात कालव्याच्या जवळ असणाऱ्या व सिंचनाखाली असलेल्या शेतीसाठी हे केविलवाणा प्रयत्न केले जात आहेत. या मोडकळीस असलेल्या चाऱ्यांची डागडुजी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
फोटो ओळ : दहागाव येथे चाऱ्यावर अशी ताडपत्री टाकून शेतीसाठी पाणी घेण्यात येत आहे.