डोंबिवली : केडीएमसीतील राजकारण खड्ड्यांवरून चांगलेच तापले असताना कंत्राटदारांनी भरपावसात ते बुजवण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु, त्यांचा हा प्रयत्न सपशेल फोल ठरला आहे. पावसामुळे खड्ड्यांत टाकलेली खडी आणि माती रस्त्यांवर पसरली आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शहरअभियंते प्रमोद कुलकर्णी यांना धारेवर धरले होते. तसेच आयुक्त गोविंद बोडके यांनी तांत्रिक विभागातील अधिकारी आणि अभियंते यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्या रद्द करून खड्डे बुजवण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी रस्त्यांचे सर्वेक्षण करत खड्डे बुजवण्यास प्रारंभ केला. परंतु, मुसळधार पावसामुळे बुजवलेल्या खड्ड्यांमधील माती-खडी इतरत्र पसरली. काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडले. यामुळे शहरातील वाहतूक मंदावली.शहरातील एमआयडीसी भागातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. तेथून मार्ग काढताना दुचाकीस्वारांची पंचाईत होत आहे. सर्व ठिकाणी सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने खड्डे शोधून ते भरताना अधिकाºयांच्या नाकीनऊ येत होते. खड्डे चुकवताना वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत.पूर्वेतील केळकर रोडहून एस.व्ही. रोडकडे वळताना, तसेच पाटकर रोडवरील वळणावरील रस्ता खराब झाला आहे. पाथर्ली भागातही पाणी साचत असल्याने वाहतूक मंदावते. मानपाडा रोडवर स्टार कॉलनीनजीक तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बाजीप्रभू चौकातही काँक्रिटचे रस्ते आणि पेव्हरब्लॉक यांच्यातील असमान पातळीमुळे पाणी साचत आहे. भगतसिंग रोड, आगरकर रोडवर खड्डे पडले आहेत. सर्वेश हॉलच्या चौकात खडी पसरल्याने कोंडी होत आहे. ठाकुर्लीतील हनुमान मंदिरापासून समांतर रस्त्याला जोडणाºया रस्त्यावरही खड्डे पडले आहेत.दरम्यान, सोमवारी सकाळीही महापालिकेचे उपविभागीय अभियंते प्रशांत भुजबळ यांनी डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली.
भरपावसात खड्डे बुजवण्याचा प्रयत्न फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:57 AM