कल्याण : डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या उद्रेकाचा सतत सामना करावा लागत आहे. त्यांना मारहाण केली जात आहे. असे हल्ले करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी विधेयक आणले आहे. त्याच्या मंजुरीसाठी संसदेत पाठपुरावा करणार असल्याचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले.‘उमा फाउंडेशन’तर्फे उमा गौरव पुरस्कार वितरण सोहळा रविवारी भोईरवाडीत पार पडला. यावेळी झालेल्या शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुहास उभे आणि अभिनेत्री सिया पाटील यांना यावेळी उमा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटविणारे कैलास पाटील, राजेश वेखंडे, नितीन बाविस्कर, विनायक भडांगे, डी. सी. किरणजी, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. संगीता गुजराथी, डॉ. मिता आहुजा यांचाही सत्कार करण्यात आला.डॉ. शिंदे म्हणाले की, डॉ. साईनाथ बैरागी आणि डॉ. प्रेमसागर बैरागी यांनी केवळ डॉक्टरी पेशा सुरू न ठेवता समाजिक बांधिलकी जपण्यासाठी उमा फाउंडेशनची स्थापना केली. डॉक्टर हे दिवसभर रुग्णसेवेत व्यस्त असतात. पण, त्यातून वेळ काढून ते समाजसेवेची कामे करीत आहेत.सरकारी रुग्णालयात कोणत्या योजना आहेत, याची माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे लोक खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. अव्वाच्या सव्वा बिल हाती मिळाल्यावर बिल कमी करण्यासाठी आमच्या मागे तगादा लावतात. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदतकक्ष सुरू केला.या मदतकक्षातील १० ते १२ जण वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकांना रुग्णालयाशी जोडण्याचे काम करीत आहेत. योजना उपलब्ध नसलेल्या रुग्णालयात त्या सुरू करण्याचे कामही करत आहेत. एका वर्षात एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली आहे. चार हजारांच्या वर रुग्णांची शस्त्रक्रिया झाली आहे. वाडा, मोखाडा असे दूरवरून रुग्ण येतात. शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांना आरक्षण मिळत होते. पण हिमोबिलियाच्या रुग्णांसाठी संसदेमध्ये विधेयक मंजूर करून घेतले आहे. त्यांचा त्यांना फायदा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तींचा सत्कारडॉ. साईनाथ बैरागी म्हणाले की, वेगवेगळ्या स्तरातील डॉक्टर समाजिक कामे करीत असतात. मात्र ते प्रसिद्धीपासून दूर असतात. त्यामुळे अशा प्रकाशझोतात नसलेल्या व्यक्तींचा आज सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रियांका सरोदे यांनी गणेशवंदना सादर करून केली. यावेळी त्यांनी ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ ही प्रार्थना सादर केली. ‘चाफा बोले ना’, ‘लग जा गले’ आदी गाणी सादर केली. यावेळी संस्थेची माहिती देणारी चित्रफीतही सादर क रण्यात आली. शिशू विकास शाळेच्या मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रेमसागर बैरागी यांनी आभार मानले.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी पाठपुरावा; श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:42 AM