ठाणे : ठाण्यात नाभिक समाज भवनासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सोमवारी येथे केले. आयुष्याचा भावी जोडीदार शोधताना सुशिक्षित आणि सुसंस्कारित जोडीदाराची अपेक्षा ठेवावी, असा सल्लाही त्यांनी उपवर वधू-वरांना या वेळी दिला.येथील पाचपाखाडीतील श्री ज्ञानराज सभागृहात श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघातर्फे आयोजित राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, ठाण्यात नाभिक समाजाला विविध लोकोपयोगी कामांसाठी तसेच कार्यक्रमांसाठी स्वत:च्या हक्काच्या समाज भवनाची गरज असल्याची मागणी संघाने केली आहे. त्यासाठी जागेचाही शोध सुरू आहे. ही जागा आणि असे विविधोपयोगी भवन उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सर्वतोपरी मदत करू, त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावाही करू, असे त्यांनी या वेळी आश्वासन दिले. इतिहासकालीन जीवा महाले, वीर भाई कोतवाल आणि संत सेना महाराज यांचे महत्त्वही त्यांनी थोडक्यात विशद केले. केशकर्तन या कलेचा राज्य शासनाच्या विशेष कौशल्यसेवेत समावेश करून त्याचा प्रमाणपत्रवर्ग उपलब्ध होण्यासाठीही आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. या वेळी राज्यभरातील सुमारे ३०० ते ४०० वधूवरांनी त्यांच्या पालकांसह या मेळाव्याला हजेरी लावली. ज्ञानेश्वर शिंदे आणि अपर्णा शिंदे यांनी वधूवरांना बोलते केले. या वेळी वधूवरांनी एकमेकांची परीक्षा घेतली. वधूवरांची माहिती असलेली पुस्तिकाही या वेळी प्रकाशित करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, उपाध्यक्ष सचिन कुटे, अरविंद माने आणि अशोक पवार आदी या वेळी उपस्थित होते.