कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सन २०१५ ची निवडणूक लढविताना पक्षाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतानाच ग्रामीण भागासाठी विशेष पॅकेजकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार, अशी ग्वाही केडीएमसीचे नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर यांनी बुधवारी दिली आहे.कल्याण-डोंबिवली शहर आणि परिसरातील स्वच्छता, वाहतूककोंडी सोडविणे, मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाची व डांबरीकरणाची कामे पूर्णत्वास नेणे, यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. याखेरीज, ठाकुर्ली टर्मिनस, कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता, डोंबिवली-माणकोली खाडीपुलाचे काम, स्मार्ट सिटी आणि त्यासंदर्भातील शासनाच्या योजना व निधी, टिटवाळा रिंग रोड, वालधुनी नदी प्राधिकरण व सुशोभीकरण, गोविंदवाडी बायपासचे उर्वरित काम आदी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कचरा डम्पिंगची समस्या लक्षात घेता कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. त्याचबरोबर शहरातील सिग्नल यंत्रणा आणि कल्याण पूर्वेतील स्कायवॉक पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करणे, ही उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महापालिकांच्या रुग्णालयांत चांगल्या सेवा मिळाव्यात तसेच परिवहन सेवेचा विस्तार आणि सक्षमीकरण, फिश मार्केट, वारकरी भवन, महिला उद्योग केंद्र, डायलेसिस सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बोटॅनिकल गार्डन याचबरोबर महापालिका क्षेत्रातील चाळींचा पुनर्विकास, धोकादायक इमारती, जुन्या इमारती यासाठी शासनाकडे वाढीव एफएसआयची मागणी, आवास आणि बीएसयूपी योजना यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष बाब म्हणजे वायफाय यंत्रणा व लोकसहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडिया हेल्पलाइन तसेच महिला सुरक्षेसाठी विशेष अॅप्स तयार करणार असल्याचेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना यांच्यापैकी कुणालाही मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलेले नाही, याचा अर्थ विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे लोकांचे मत आहे. याची नोंद घेत पक्षश्रेष्ठींनी युती केली असून आगामी काळात शहरांचा विकास केला जाईल. -कपिल पाटील, खासदार, भिवंडीकल्याण पूर्वेत भाजपाला जे अभूतपूर्व यश मिळाले, त्यातून नागरिकांना बदल अपेक्षित होता, हे स्पष्ट होते. नवनिर्वाचित उपमहापौर कल्याण पूर्वेचा असल्याने या मतदारसंघात येणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि त्याचसोबत नागरिकांचे राहणीमान उंचावणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. - गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्वकल्याण-डोंबिवलीकरांना धन्यवाद द्यायला आलो असून शिवसेनेच्या कामाची परंपरा नवीन महापौर कायम ठेवील. आमचा महापौर होणारच होता, मात्र सगळे मिळून विकास करू या म्हणून भाजपासोबत एकत्र आलो आहे. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची रक्कम आता त्यांनी द्यावी. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना
ग्रामीण भागाच्या विशेष पॅकेजसाठी पाठपुरावा
By admin | Published: November 12, 2015 1:19 AM