ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २२ आॅगस्ट रोजी ईडीच्या चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा मनसेने सोमवारी दुपारी दिला होता. मात्र, लागलीच राज यांनी हस्तक्षेप करून लोकांना त्रास होईल, असे काही करू नका, अशी सक्त सूचना दिल्यानंतर पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी लागलीच बंद मागे घेतला. परंतु, त्यांनी ईडीच्या नोटीसचा जाहीर निषेध करून ती जाळली.गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनविरोधात राज यांनी वातावरण तापवले असून यासंदर्भात त्यांनी सोनिया गांधींसह ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर, कोहिनूर मिलसंदर्भात ईडीची चौकशी लावण्याचे संकेत भाजप सरकारने देऊन तशी नोटीसही सोमवारी बजावली. याचे लगेचच पडसाद मुंबई, ठाण्यात उमटून वातावरण तापायला सुरु वात झाली. ठाण्यात तर २२ आॅगस्ट रोजी मनसेने बंदचे आवाहन केले. या दिवशी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही जाधव यांनी दिला. सोशल मीडियावरही बंदच्या आवाहनानंतर वातावरण तापू लागले. मात्र, राज यांनी जाधव यांना फोन करून लोकांना त्रास होईल, असे काहीही करू नका, अशी सूचना केली. त्यानंतर लगेचच जाधव यांनी हा बंद मागे घेऊन सायंकाळी आपल्या कार्यालयाबाहेर राज यांना दिलेली ईडीची नोटीस प्रत जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.राज यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्या तीव्र भावनेमुळे आम्ही सरकारविरोधात ठाणे बंदचे आवाहन केले होते. परंतु, राज यांच्या आदेशानंतर तो मागे घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. परंतु, राज यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलवल्यास त्या दिवशी काय केले जाईल, याची दिशा बुधवारी ठरवू, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाचे गुपित सध्या तरी गुलदस्त्यात आहे. यावेळी ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, नैनेश पाटणकर, अनिल म्हात्रे, समिषा मार्कंडे व इतर उपस्थित होते.
राज यांच्या सूचनेनंतर मनसेचा गुरुवारचा ठाणे बंद मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:08 AM