भिवंडी - तालुक्यातील पडघा येथील दुकानदारांना अन्न व औषध प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका भामट्यास दुकानदारांनी व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आश्विनगिरी गोविंदगिरी गोस्वामी (४२, रा. मुलुंड) असे अटक झालेल्या भामट्याचे नाव आहे. त्याने शुक्रवारी पडघा गावातील दुकानदार मधुकर गवळी यांच्याकडून अन्न व औषध खात्याचा अधिकारी असल्याचे सांगून कारवाई टाळण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ हजार रुपये उकळले होते. त्यानंतर तो बाजारपेठेतील इतर दुकानदारांकडे गेला असता त्यांना संशय आल्याने व अगोदरच पाळतीवर असलेल्या दुकानदारांनी त्याला पकडून पडघा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या भामट्याने अन्न व औषध खात्याचा अधिकारी असल्याचे सांगून मागील काही दिवसांपासून पडघ्यातील अनेक दुकानदांराकडून पैसे उकळल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे. तसेच त्याने आणखी किती ठिकाणी व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले आहेत, याबाबत पोलीस तपास करत आहे.