ठाणे : कळवामधील मनिषा नगर भागातील सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळेतील इयत्ता पाचवी आणि सहावीत शिक्षण घेत असलेल्या तब्बल ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शासनाकडून देण्यात येणारे शालेय पोषण आहार या शाळेत देखील दिले जात होते. मंगळवारी दुपारी मनिषा नगर दत्तवाडी सहकार विद्या प्रसारक मंडळातील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यात भात, डाळ आणि मटकीच्या उसळी आदींचा समावेश होता. हे अन्न देत असतांनाच काही विद्यार्थ्यांना त्याच्या वासानेच मळमळल्यासारखे झाले. तर काहींनी अन्न खाल्यानंतर त्यांना उलटी, पोटदुखी आदींचा त्रास सुरु झाला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तत्काळ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले.
हे अन्न खाल्याने ४० विद्यार्थ्यांना त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने वर्तविला आहे. त्यातही शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या घराच्यांना सांयकाळच्या सुमारास याची माहिती दिल्याने विद्यार्थ्यांचे पालकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. विषबाधा झालेले विद्यार्थी हे इयत्ता पाचवी आणि सहावीत शिकणारे असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर या पूर्वी देखील येथे देण्यात येणाऱ्या अन्नातून झुरळ, किडे आढळून आल्याचा दावा माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे.
तसेच पालकांना देखील ही माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. त्यातही शालेय पोषण आहार हे आधी शाळेच्या मुख्याध्यपकांनी खाणे अपेक्षित असतांना त्यांनी तसे न करता थेट विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयात दाखल झालेल्या ४० विद्यार्थ्यांवर रुग्णालय प्रशासनाकूडन उपचार सुरु असून अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांना हा त्रास झाला असावा असा अंदाज असल्याची माहिती रुग्णालयातील डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.