सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली जिल्ह्यातील अधिकारी ग्रामीण, दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवत आहे. त्यांच्यासोबत राहून त्यांच्या समस्या एकूण घेण्यासह त्यांच्या विविध विषयावर हितगुज करीत असताना आता शेतीसाठी पाणी आडवण्याचे कामही अधिकारी करीत आहेत. यासाठी वाहत्या नदी, नाल्याचे पाणी वनराई बंधाऱ्याद्वारे अडवण्याचे काम सध्या केले जात आहे. यास अनुसरून भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील शिवारात अधिकाऱ्यांनी वनराई बंधारा घालून पाणी अडवले आहे.
शेतकऱ्यांसोबत एक दिवस राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना धीर देण्यासह शेतीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचे मार्गदर्शन ‘माझ्या बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमाखाली अधिकारी करीत आहेत. यासह आता वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर शेतीसाठी म्हणजे रब्बी पिकासाठी करता यावा, गायीगुरांसह जनावरांना उन्हाळ्यात पाणी मिळावे आदीसाठी अधिकाºयांकडून वनराईबंधारे बांधले जात आहे.
याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी मंडळ अधिकारी आर.ड. शिरसाट आदींसह क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची साप्ताहिक बैठक वापे येथील क्षेत्रावर घेतली . या आढावा बैठकीनंतर ‘एक दिवस बळीराज्यासाठी’ या उपक्रमाअंतर्गत सर्व कृषी सहाय्यक, अंबाडी व अनगांव येथील कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी अंबाडी येथील नदीवर वनराई बंधारा बांधला आहे.
अधिकाऱ्यांनी २५.५० मीटर लांब व एक मीटर उंचीचा बंधारा घातला आहे. वनराई बंधाऱ्यातील पाणीसाठ्याची २०५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर या क्षेत्रात तब्बल एकूण पाच टीसीएम पाणीसाठा तयार झाल्याचे सुतोवाच जिल्हा कृषी अधीक दिपक कुटे यांनी लोकमतला सांगितले. या बंधाऱ्यातील पाण्यामुळे तब्बल १५ हेक्टर शेती ओलीताखाली येणार असून त्यामुळे १२ शेतकऱ्यांच्या शेतीला या पाण्याचा लाभ होणार असल्याचे कुटे यांनी लक्षात आणून दिले. या वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना आता मिरची, भेंडी, मोगरा, आंबा आदी भाजीपाल्यासह फळबागांना वाढवणे शक्य होत आहे. या वनराई बंधाऱ्यांच्या कामात तालुका कृषी अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी कृषी पर्यवेक्षक संजय घुडे, बाळकृष्ण गायकवाड, गुरुनाथ शेलार, कृषी सहाय्यक विवेक दोंदे, नरेश बुजड, देवेंद्र गावंडा, हर्षल पाटील, स्नेहल वळंज, नूतन पाटील, अर्चना धलपे आदींनी श्रमदान करून बळीराजाच्या शेतीसाठी व जनावरां करीता वनराई बंधारा बांधला आहे.