ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त ठाणे महानगरपालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या 'उत्सव ७५ ठाणे' महोत्सवात आज कोळी बांधवांनी आपला सहभाग नोंदवला. पारंपारिक वेशभूषेत कोळीबांधवांनी विटावा खाडी ते चेंदणी कोळीवाडा खाडीपर्यत आपल्या होड्या घेवून रॅली काढली. ठाणे शहरात अशा पध्दतीच्या रॅलीचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले होते.
आगरी कोळी बांधव हे ठाण्याचे भुमीपुत्र. आजही विटावा, चेंदणी परिसरात आजही कोळीवाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत. या कोळीबांधवांना अमृतहोत्सवी वर्षांत सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषेत कोळीबांधवांसह महिलाही अतिशय उत्साहात सहभागी झाल्याचे दिसून आले. विटावा येथून ही रॅली चेंदणी कोळीवाडा येथे पोहोचल्यावर कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला.