मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात सुरु असलेल्या पोलीस शिपाई व वाहन चालक पदाच्या भरतीसाठी चक्क बी.टेक., एम.ई , बी.ई., एम.बी.ए., बी.बी.ए., बी.फार्म., बी.कॉम., एम. कॉम., एम.एस.सी., बी.एस.सी., एल.एल.बी. केलेले अति उच्चशिक्षित पदवीधरकांनी सहभाग घेतला आहे.
आयुक्तालयाच्या ९९६ पोलीस शिपाई व वाहन चालक पदांच्या पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून ७३ हजार २२१ अर्ज आले आहेत. त्यात मुलांचे ६० हजार ९८९ तर मुलींचे १२ हजार २३२ अर्ज पोलीस शिपाई या पदाकरीता आले आहेत. पोलिसांच्या १० वाहन चालक पदाकरीता १ हजार १९६ मुलांचे तर ४१ मुलींचे असे १ हजार २३७ अर्ज आले आहेत.
भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात शारीरिक तपासणी , फिटनेस याच्या परीक्षा घेतल्या जात आहेत . आश्चर्य म्हणजे पोलीस शिपाई व वाहनच चालक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आलेल्या अर्जात अतिउच्चशिक्षित व उच्चशिक्षितांची संख्या मोठी आहे.भरतीसाठी आलेल्या उमेदवारां मध्ये उच्च शिक्षित बी.टेक. केलेल्या तरुणांची संख्या १४१ तर बी . ई . केलेल्यांची संख्या ३७१ इतकी आहे. एम.ई केलेले ४, एम.बी.ए केलेले ४५, बी.बी.ए केलेले ८१, बी.फार्म केलेले ५०, एम कॉम चे ५२९, एम.एस.सी केलेले २७९ उमेदवार आहेत.
या शिवाय बी.कॉम (४४७३), बी.एस.सी (३९५२), एल.एल.बी (१०), एम.ए (१७३७), बी.ए (१४,८४३), बी.बी.एम (२४), बी.सी.ए (२६८), बी.एड (८), बी.एम.एस (६४), बी.पी.एड (२०), एम.पी.एड(३), बी.सी.एस (१५८), बी.एस. डब्ल्यू (३१), एम.एस.डब्ल्यू (४१) असे उच्चशिक्षित पोलीस शिपाई व वाहन चालक भरतीसाठी आले आहेत. पदवीधरकांसह तब्बल २७ हजार १३२ उच्च शिक्षितांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले असल्याची माहिती पोलिसां कडून देण्यात आली आहे.