जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ ट्रक उलटल्याने घोडबंदरच्या दाेन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली हाेती. त्यात गुरुवारी मेट्राेचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर पहाटेपर्यंत रखडलेली माेठी मालवाहू वाहने रस्त्यावर आली. त्यात काही वाहने बंद पडल्याने सलग तिसऱ्या दिवशीही ठाणेकरांना वाहतूककाेंडीला सामाेरे जावे लागले. त्यात विरुद्ध दिशेने वाहने आल्याने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांची माेठी काेंडी झाली. ही वाहतूककाेंडी फाेडण्यासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे घोडबंदरमार्गे उरण, गुजरात आणि नाशिक भागांत माेठ्या मालवाहू वाहनांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावर गायमुख येथील घाटरस्त्यावर अनेकदा माेठी वाहने बंद पडण्याच्या घटना घडत असतात. तर, पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ ट्रक, कंटेनर उलटण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे घाेडबंदर मार्गावरील वाहनकाेंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंगळवार आणि बुधवारी सलग दाेन दिवस ट्रक उलटल्याने या भागात सलग दाेन दिवस वाहतूककाेंडीचा ठाणेकरांना सामना करावा लागला.
घोडबंदर ते गायमुखपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी टाकलेल्या बॅरिकेडस्मुळे आधीच रस्ते अरुंद झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकेरी पद्धतीने वाहतूक सुरू आहे. मेट्राेच्या कामासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने रात्री १२ ते गुरुवारी पहाटे ५ पर्यंत माेठ्या वाहनांसाठी मार्ग बंद केला हाेता. पहाटे ५ नंतर मार्ग सुरू झाला. त्यावेळी काही वाहनचालक चक्क झाेपले हाेते. रात्रभर रखडलेली बहुतांश वाहने रस्त्यावर आल्याने सकाळी आठ ते दुपारी १२:३० दरम्यान या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूककाेंडी झाली.
सकाळी ७ ते १० वाजण्याच्या सुमारास गायमुख, वेदान्त हॉस्पिटल तसेच कापूरबावडी या ठिकाणी तीन ट्रक बंद पडले हाेते. ही वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला करेपर्यंत अनेक वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने नेल्याने दोन्ही मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचा दावा वाहतूक पाेलिसांनी केला. सायंकाळी ४:३० वाजता पुन्हा घोडबंदर रोडवरील सेवारस्त्यावर टेम्पो बंद पडला. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडीला सायंकाळपर्यंत अनेक वाहनचालकांना ताेंड द्यावे लागले.
रात्री सुरू झालेले मेट्राेचे काम गुरुवारी पहाटे संपले. त्या काळात माेठी वाहने थांबवून ठेवली हाेती. हीच वाहने सकाळी रस्त्यावर आली. या काळात अनेक वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने वाहने नेल्याने दाेन्ही मार्गांवरील वाहने वाहतूककाेंडीत अडकली. - पंकज शिरसाठ, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर