ठाणे : शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अपेक्षेनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर विचारे हे ठाकरे यांच्यासोबत राहिले.
विचारेंची ही लोकसभेची तिसरी निवडणूक आहे. यापूर्वी दोन्ही निवडणुकीत विचारेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता. मात्र यावेळी विचारे यांना स्वपक्षातील जुन्या साथीदारांसोबत दोन हात करावे लागतील. ठाण्याच्या जागेवरून शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. वाटाघाटीत ही जागा भाजपने खेचली तरी उमेदवार निवडून आणण्याचे शिवधनुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच उचलावे लागेल. त्यामुळे यावेळी स्व. आनंद दिघे यांच्या दोन सच्च्या शिवसैनिकांमधील संघर्ष ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे.
१) विचारे यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार असा झाला आहे. मागील निवडणुकीत विचारे यांचा मोठा मताधिक्क्याने विजय झाला होता. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार या नात्याने विचारे रिंगणात उतरले होते. यावेळी भाजप व शिवसेनेतील मोठा गट त्यांच्यासोबत नाही.
२) निवडणुकीतील सर्व जुळवाजुळव यावेळी त्यांनाच करावी लागणार आहे. शिवसेनेतील शिंदे गटातील बहुतांश इच्छुक हे विचारे यांच्यापेक्षा शिवसेनेत खूपच उशिरा दाखल झालेले आहेत. भाजपने ही जागा वाटाघाटीत पदरात पाडून घेतली किंवा भाजपचा उमेदवार शिवसेनेला दत्तक देऊन ठाणे लढवले तरी विजयाची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच सोपवली जाईल.
निवडणुकीतील मते-
२०१४ - २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजन विचारे यांच्या समोर राष्ट्रवादीचे संजीव नाईक उमेदवार होते. या निवडणुकीत एकूण मतदार २० लाख ७३ हजार २५१ होते. त्यापैकी मतदान करणाऱ्यांची संख्या १० लाख ५४ हजार १८९ एवढी होती. विचारे यांना ५ लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना ३ लाख १४ हजार ०६५ मते मिळाली.
२०१९ - या निवडणुकीत विचारे यांची लढत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यासोबत झाली. यावेळी मतदारांची एकूण संख्या २३ लाख ०७ हजार ०९० होती तर मतदान करणाऱ्यांची संख्या ११ लाख ७० हजार ५१८ होती. राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली. तर आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मते मिळाली होती. विचारे यांनी परांजपे यांचा ४ लाख १२ हजार १४५ मतांनी पराभव केला होता.
ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्याकरिता जी विकासकामे केली, त्याच जोरावर ही निवडणूक लढविणार आहे. याच ठाण्यामध्ये पहिली गद्दारी झाली होती. तिचा बीमोड केला गेला होता. त्याच ठाण्यात आता दुसऱ्यांदा गद्दारी झाली. गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा हा सामना आहे. ठाण्यातील जनता योग्य तो न्याय देईल.- राजन विचारे