मुरबाड : मुरबाडच्या तहसीलदारपदाचा नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या संदीप आवारी यांनी गळ्यात ओळखपत्र आणि टेबलावर आपल्या नावाची पाटी लावण्याचे आदेश कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. साेमवारी आवारी यांनी सर्व शाखांमध्ये फेरफटका मारला असता एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या गळ्यात ओळखपत्र नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांची मुंबई येथे बदली झाल्याने त्यांचे जागी संदीप आवारी यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी मुरबाड कार्यालयाचा पदभार स्वीकारताच पुरवठा शाखा, संजय गांधी शाखा, सामान्य शाखा, निवडणूक शाखा, अभिलेख शाखा, नोंदणी शाखा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेतली. मात्र कार्यालयात येणारे अभ्यागत आणि कर्मचारी कोण ओळखणे मुश्कील झाल्याने त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना ओळखपत्र व टेबलावर आपल्या नावाची व पदाची पाटी टेबलावर लावणे आवश्यक आहे. तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे केल्यानंतर ओळखपत्र शोधण्यासाठी धावपळ उडाली.
आवारी यांनी पदभार स्वीकारताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव, ठाणे जिल्हा व्यायामशाळा संघाचे अध्यक्ष संजय हंडोरे, सुधीर पोतदार, उद्योजक गणेश वारघडे, नितीन सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.