कल्याण : पश्चिमेतील प्रसिद्ध असलेल्या वाणी विद्यालयाने तामीळ भाषेची सक्ती केल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळेवर धडक देत जाब विचारला. त्यावर शाळेने हा विषय सक्तीचा नसून वैकल्पिक असल्याचे स्पष्ट केले.वाणी विद्यालयाने विद्यार्थ्यांना तामीळ भाषा शिकण्याची सक्ती केल्याची तक्रार काही पालकांनी मनसेच्या पदाधिकाºयांकडे केली. हा प्रकार कळताच मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई, महिलाध्यक्षा शीतल विखणकर आदींनी शाळेत धाव घेत व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यावर व्यवस्थापनाने सांगितले की, मनसेला मिळालेल्या तक्रारी अयोग्य आहेत. आमची शाळा ही अल्पसंख्यांक प्रवर्गातील आहे. त्यामुळे तामीळ भाषेचा समावेश शिक्षणात करणे बंधनकारक आहे. भाषा शिक्षण हे सक्तीचे नसून वैकल्पिक आहे. त्यामुळे ज्याला तामीळ शिकण्याची इच्छा आहो, तो ती शिकू शकतो. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. दरम्यान, शाळेने तसे लेखी आश्वासन दिल्यानंतर मनसेने हे आंदोलन मागे घेतल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. मात्र, पालकांनी तामीळ भाषा सक्तीला विरोध असल्याचे स्पष्ट केले.
तामीळ भाषा शिकण्याची केली सक्ती, वाणी शाळेवर मनसेची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:23 AM