ठाणे : सार्वजनिक बांधकाम विभागाचे (एमएसआरडीसी) राज्याचे मंत्री हेच ठाण्याचे पालकमंत्री असूनही ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. याच खड्ड्यांमुळे घोडबंदर रोडवर एका दुचाकीस्वाराचा मंगळवारी नाहक बळी गेला, तर बुधवारी दुपारीही खारेगाव ते तीनहात नाका आणि तीनहात नाका ते घोडबंदर रोडपर्यंत मुंबई-नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. यामुळे शेकडो ठाणेकरांना सक्तीचा रस्ते ब्लॉक बुधवारी दुपारी २ ते ४ या दोन तासांच्या काळात सोसावा लागला. याच रस्त्यावरून केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह तीन आमदार, दोन खासदार रोज प्रवास करतात; परंतु तेही हतबल झाल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सव काळात खड्डे बुजविण्याचे काम होईल या अपेक्षेवर असलेल्या ठाणेकरांना अनंत चतुर्दशीपर्यंतही या खड्ड्यांमधून दिलासा मिळाला नाही. सध्या शहरातील नितीन कंपनी ते तीनहात नाका या पालकमंत्री एकनाथ शिंदे याच्या निवासस्थानाच्या दारासमोरूनच जाणाऱ्या सेवा रस्त्यावर, नितीन कंपनी ते कॅडबरी, कॅडबरी ते माजीवडा हा सेवा रस्ता, तसेच याविरुद्ध बाजूला असलेल्या रस्त्यारवरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तीनहात नाका ते माजीवडा मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्ग ते पुढे खारेगाव टोलनाक्यापर्यंत अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी तर ‘खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डा’ अशी परिस्थिती आहे. कापूरबावडी नाका ते अगदी काल्हेर आणि भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गाची स्थिती तर अत्यंत खराब आहे. त्यातच अनेक ठिकाणी मेट्रोच्या कामांमुळेही रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. मध्यंतरी नारपोली वाहतूक शाखेने कोंडी होऊ नये म्हणून खड्डे भरण्याचे काम सुरू केले होते. आणखी काेणाचा बळी जाण्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची अपेक्षा ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.
‘शहरातील खारेगाव नाका, तसेच इतर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ही कोंडी होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पालकमंत्र्यांसोबत याबाबत बैठकही झाली आहे.’
डॉ. विनय राठोड, प्रभारी पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर