ठाणे : मोटारसायकलने आलेल्या दोघांनी रिक्षाने जाणाऱ्या एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४० हजारांच्या दोन सोनसाखळ्या जबरीने खेचून पलायन केल्याची घटना वागळे इस्टेट येथे बुधवारी घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तकनगर येथे राहणारी ही महिला तिच्या मैत्रिणींसह रिक्षाने वागळे इस्टेट येथील फिटनेस फॅक्टरी जीमसमोरील रस्त्याने १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास जात होती. त्याचवेळी अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या एका मोटारसायकलवरील दोघांपैकी मागे बसलेल्याने तिच्या गळ्यातील एक लाख ९० हजारांचे साडेपाच तोळे वजनाची सोनसाखळी आणि दीड तोळे वजनाची एकपदरी ५० हजारांची दुसरी सोनसाखळी अशा दोन सोनसाखळ्यांची जबरी चोरी करून पलायन केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी.एस. निकुंभ हे अधिक तपास करीत आहेत.