लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/ अंबरनाथ : गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या ठाण्यातील महिलेला कापूरबावडी पोलिसांनी तर बदलापुरातील नामदेव पुजारे या दुचाकीस्वाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. बदलापुरातील एका ढाब्यासह गावठी दारुच्या अड्डयावरही या पथकाने कारवाई केली. यात दोघांना अटक केली असून गावठी दारुसह एक लाख ३३ हजार २७५ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अंबरनाथच्या ढाब्यांवरच मद्य विक्री खुलेआम सुरु असल्याबाबत ‘हायवेवरील ढाब्यांवर बेकायदा बार’ या मथळयाखाल्आी ‘लोकमत’ने ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ प्रसिद्ध करताच राज्य उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय भरारी तसेच अंबरनाथच्या पथकाने आठ ढाब्यांवर कारवाई करुन आठ जणांना अटक केली. बदलापूर पश्चिमेतील एरंजाड गावातील आई एकवीरा ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या गिरीश मेहेर याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून २.५२ बल्क लीटर विदेशी मद्य जप्त केले. बदलापूरच्या कर्जत रोडवरील सुभाषनगर भागात एका दुचाकीवरुन गावठी दारुची विक्री करणाऱ्या नामदेव पुंजारे (रा. मानकिवली गाव) याला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास अटक केली. त्याच्याकडूनही ४० लीटर गावठी दारु जप्त केली. तिसरी कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील मंगरुळ आणि ढोके गावात निरीक्षक लाड यांच्या पथकाने दोन बेवारस गावठी अड्डयांवर केली. दरम्यान, ठाण्यात कापूरबावडी पोलिसांनीही चितळसर भागात गावठी दारु विक्री करणाऱ्या सीता यादव (५५) या महिलेला मंगळवारी रात्री अटक केली. तिच्याकडून दहा लीटर गावठी दारु हस्तगत केली असून तिच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बदलापूरच्या ढाब्यांत सापडले विदेशी मद्य
By admin | Published: July 06, 2017 6:18 AM