भिवंडी - शहरातील गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या एकास कार व मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना कल्याण भिवंडी मार्गावरून विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनिरी धनराज केदार,विजय मोरे,प्रफुल्ल जाधव,पोउपनिरी रमेश शिंगे, सपोउनिरी रामचंद्र जाधव, पोलीस कर्मचारी मंगेश शिर्के, सविन जाधव, सचिन सोनवणे, नरसिंह क्षीरसागर, भावेश घरत,अजितसिंग राजपुत,श्रेया खताळ,रविंद्र साळुंखे व राज्य उत्पादन शुल्क विभाग,भिवंडी यांचे संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
रांजणोली नाका, भिवंडी बायपास सार्वजनिक रोडवर संशयित कार आल्यानंतर पोलिसांनी कार थांबवत पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यामध्ये मॅकडॉल या विदेशी ब्रँड च्या ११५२ बाटल्याचे २४ बॉक्स आढळले. याप्रकरणी कार चालक संजय ज्ञानेश्वर कोळेकर रा.ऐरोली,नवी मुंबई यास ताब्यात घेत त्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी, चौकशी केली असता हा विदेशी मद्यसाठा सुनिल उर्फ बाबु याचा असल्याचे त्याने सांगितले. त्यांनतर त्यांनी साठवणूक केलेल्या मॅकडॉल या ब्रँडच्या विदेशी दारूचे १३० बॉक्स मधील ६२४० बाटल्या मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील हेदुटणे येथुन जप्त करण्यात आलेले आहेत. या एकूण कारवाईत ४ लाख ७३ हजार ८८ रुपये किमतीच्या ७३९२ बाटल्या विदेशी मद्य व कार, मोबाईल , रोख रक्कम असा एकूण ८ लाख ८८ हजार ८८ रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.