ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून परप्रांतीय नागरिकांनी घरची वाट धरली होती; परंतु आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने हे नागरिक पुन्हा कामासाठी ठाण्याच्या दिशेने येऊ लागले आहेत. त्यानुसार मागील आठवडाभरात ठाणे स्थानकात पाच हजार ७३५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यातील ५७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघड झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत घेतलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातची कामे गेली होती. काहींना आपल्या गावीही जाता आले नव्हते. त्यानंतर अनलॉकमध्ये गावी जाण्यासाठी ठाण्यासह इतर स्थानकांमध्ये परप्रांतीयांचे लोंढे वाढले होते. कोरोनाची पहिली लाट ओसरताच गावी गेलेले परप्रांतीय कामानिमित्ताने पुन्हा मुंबई, ठाण्याच्या दिशेने परतू लागले. काही महिने हाताला काम मिळते ना मिळते तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊन आपले हाल होतील या भीतीने आधीच परप्रांतीयांनी पुन्हा गावची वाट धरली; परंतु आता कोरोनाची दुसरी लाटही काही प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यामुळे आता परप्रांतीयांचे लोंढे मुंबई, ठाण्याच्या दिशेने येऊ लागले आहेत; परंतु कोरोना चाचणीपासून लपण्यासाठी अनेकांनी ठाणे स्टेशन किंवा इतर ठिकाणांहून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला होता. अशातच मागील काही दिवसांत परप्रांतीय येण्याची संख्या वाढू लागल्याने ठाणे महापालिकेने पुन्हा स्टेशन परिसरात अँटिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. स्टेशनवर उतरल्या उतरल्या अशा नागरिकांना हेरून त्यांची चाचणी ठामपाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात चाचणी करून घेण्यासाठी काही दिवसांपासून रांगा वाढल्याचे चित्र दिसत आहे.
‘चाचणी करूनच शहरात प्रवेश करा’
- ठामपाने ३० ऑगस्ट २०२० पासून रेल्वेस्थानक परिसरात अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ३० ऑगस्ट २०२० ते २६ मे २०२१ पर्यंत रेल्वेने आलेल्या एक लाख ९१ हजार ४१२ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील तीन हजार ४२५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
- तर, २० मे ते २६ मे दरम्यान ठामपाच्या माध्यमातून स्टेशन परिसरात पाच हजार ७३५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ५७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी आधी कोरोना चाचणी करावी, मगच ठाण्यात प्रवेश करावा, असे आवाहन आता ठामपाने केले आहे.
-------------