ठाणे : दहा ते पंधरा हजार रुपयांना एका माकडाची विक्री करण्यासाठी आलेल्या कळवा पूर्व येथील आडवाजी गंगाराम गाडगे (२८) या तरुणाला ठाणे वनविभागाने अटक करून त्याच्याकडून रसिस मकाक प्रजातीची तीन माकडे हस्तगत केली आहेत. त्याला ६ जानेवारी २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे वनविभागाने दिली.कळव्यातील मफतलाल, शिवाजीनगर येथे एक व्यक्ती माकड हे वन्यप्राणी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार, ३० डिसेंबर रोजी रात्री कळव्यात सापळा लावण्यात आला. यावेळी एक तरुण संशयितरीत्या प्लास्टिकच्या बास्केटसह दिसून आला. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील प्लास्टिकच्या बास्केटची तपासणी केली असता तीमध्ये एक माकड मिळून आले. त्यावेळी एक माकड १० ते १५ हजार रुपयांना विकणार असल्याची कबुली त्याने दिली. तसेच ३१ डिसेंबर रोजी त्याच्याकडून आणखी दोन माकडे हस्तगत केली असून त्या तीन माकडांमध्ये एक मादी माकड असल्याची माहिती वनविभागाने दिली. त्याने ही माकडे कुठून आणली आणि तो केव्हापासून वन्यप्राण्यांची विक्री करत आहे, याचा तपास सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.ठाणे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक बी.टी. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल मनोज परदेशी, प्र.बा. कुडाळकर, कारंडे, वनरक्षक पी.के. आव्हाड, पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. वन्यजीवविषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ठाणे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांनी केले आहे.
माकडांची विक्री करणाऱ्यास ठाण्यात वनविभागाकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:36 AM