ठाणे : कळव्यातील घोलाई नगर भागात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेल्याने वन विभागावर टीकेची झोड उठू लागली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या वन विभागाने आता मंगळवारपासून पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा सर्व्हे पुन्हा नव्याने सुरू केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील अशा घटनांनंतर वन विभागाने अशा सर्व्हेपलिकडे काही केलेले नाही. त्यामुळे आता तरी काही ठोस कारवाई वन विभाग करणार का? असा प्रश्न करण्यात येत आहे.
पुढील दोन दिवस हा सर्व्हे केला जाणार असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरविली जाईल; परंतु ही कारवाई अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या किंवा डोळेझाक करणाऱ्यांवर होणार का? याचे उत्तर मात्र सध्यातरी यातील कोणत्याही यंत्रणेकडे नाही. कळवा घोईल नगर भागात पारसिक टेकडीवर मागील कित्येक वर्षांपासून शेकडो झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. दरवर्षी त्या वरवर सरकताना दिसत आहेत; परंतु त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यातूनच सोमवारी दरड कोसळून पाच जणांचा बळी गेला. त्याची जबाबदारी आता कोण घेणार, कारवाई कोणावर होणार, भूमाफियांना अटकाव बसणार का?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. आता वन विभागावर टीकेची झोड उठल्यानंतर आता त्यांनी या भागातील झोपड्यांचा सर्व्हे सुरू केला आहे.
महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीने प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने वारंवार वन विभागाशी पत्रव्यवहार करून या झोपड्यांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. यावर्षीही पावसाळा सुरू होण्याआधी मे महिन्यात वन विभागाला पत्र पाठवले होते; मात्र वनविभाग गाफिल राहिल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.