मीरारोड - भाईंदरचा जेसलपार्क येथील खाडी किनारा कुरव ( सीगल ) या परदेशी पक्ष्यांनी फुलल्याचे वृत्त लोकमतने देताच वन विभागाने पाहणी करुन लोकांमध्ये जनजागृती केली. लोकांनीसुद्धा सीगल पाहण्यासाठी गर्दी केली. नवघर पोलिसांनीसुद्धा पक्ष्यांची पाहणी केल्यावर पालिकेला पत्र देणार असल्याचे म्हटले. पालिकेचे मात्र कोणीच न फिरकल्याने त्यांची उदासीनता दिसून आली.
युरोप व आशियाई देशातून आलेल्या सीगल या परदेशी पाहुण्यांनी जेसलपार्क येथील वसई खाडी किनारी मुक्काम केला आहे. त्यामुळे हा परिसर या समुद्री पक्षांनी गजबजून गेला आहे. या पक्ष्यांच्या आहाराची माहिती नसल्याने लोकांकडून त्यांना शिळ्या चपात्या, शिळे पाव, पीठ खाण्यास दिले जात आहेत. परिणामी या परदेशी पाहुण्यांना विविध विकार होण्याची भीती आहे. तसेच स्वत:हून आपला आहार घेण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असतो.
लोकमत 'हॅलो ठाणे'मध्ये या बाबतचे वृत्त आल्यावर वन विभागाचे वनरक्षक संजय चव्हाण यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आज गुरुवारी येथे येऊन पाहणी केली. या वेळी गाठिया आदी निषिद्ध असलेले खाद्यपदार्थ टाकण्यास चव्हाण यांनी लोकांना रोखले व त्याची माहिती दिली. लोकांमध्ये सीगल बद्दल जनजागृती केली. नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम भालसिंग यांनी खाडी किनारी येऊन पाहणी केली. सदर पक्ष्यांचा आढावा त्यांनी घेतला. पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण पालिकेस सुरक्षा रक्षक ठेवण्यास सांगणार असल्याचे भालसिंग म्हणाले.