ठाणे : सध्या ऊन वाढत चालले आहे आणि पाऊस यायला देखील वेळ आहे. अशातच आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी ठाणे पूर्वेतील बारा बांगला येथील वनवसाहतीत राहणाऱ्या वनरक्षकाने घरातील रिकाम्या तेलाच्या पत्र्याच्या डब्याचे भांडे तयार केले आहे. पक्ष्यांना एकावेळी अन्न व पाणी मिळेल अशी सोय या भांड्यात केली आहे. पंकज कुंभार यांनी आपल्या कल्पकतेतून हे भांडे तयार करून झाडांच्या पानाने ते सजविले देखील आहे. आता त्यावर पक्ष्यांचा वावर देखील सुरू झाला आहे. मे महिन्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. पक्ष्यांना या काळात पोटातले पाणी कमी होऊन उष्माघाताचा फटका बसतो. अनेकदा ते चक्कर येऊन खाली पडतात आणि जखमीही होतात तर काही मृत्युमुखींही पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवण्याचे आवाहन वेळोवेळी पक्षी मित्र किंवा संघटना करीत असतात. पक्षीप्रेमी कुंभार यांनी आज सकाळी त्यकेवळ दोन तासांत घरात रिकाम्या झालेल्या पत्र्याच्या तेलाच्या डब्यापासून भांडे बनवून पक्ष्यांना खाणे पिण्याची सोय त्यात केली आहे. पक्ष्यांसाठी काहीतरी करावे म्हणून ही कल्पना सुचली. आपण प्रत्येकाने ह्या लहान जीवनासाठी काहीतरी केले पाहिजे. त्यांना ही अन्न, पाणी, निवारा ह्यांची गरज असते. ह्याच विचारातून प्राणी-पक्ष्यांकरिता काहीतरी सतत करत करावेसे वाटते असे कुंभार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी त्यांनी लाकडांपासून चिमण्यांकरिता घरटे बनविले होते. तसेच अन्न आणि पाण्याकरिता भांडी तयार करून त्यावर पक्ष्यांचा मुक्त वावर सुरू होता. त्यातच आता नवीन एक कल्पना त्यांना सुचली. घरातील तेलाचा रिकामा डब्बा घेऊन त्याला बाजूने चार भाग प्लेटसारखे कापून त्यात कडधान्य ठेवले आणि मधील भागात पाणी ठेवण्यासाठी जागा केली. आता पक्ष्यांना एकाच वेळी अन्न आणि पाणी मिळेल. अशीच कल्पना सर्वांनी प्रत्यक्षात आणली, तर पक्ष्यांना वेळीच अन्न व पाणी मिळेल. मुक्या प्राणी पक्षी यांना मदत करणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. जसा माणूस अन्न पाण्यावाचून जिवंत राहू शकत नाही, तसेच प्राणी आणि पक्षी ही जिवंत राहू शकत नाही अशा भावना कुंभार यांनी व्यक्त केल्या. त्यांनी हे भांडे झाडाच्या पानांनी सुंदर सजविले असून घराच्या मागे परसबागेत ठेवले आहे. आता तिथे चिमणी, रॉबिन, सुर्यपक्षी, शिंपी, तांबट, मुनिया, पोपट, मैना आदी पक्षी येत आहेत.
वनरक्षकाने रिकाम्या डब्यापासून पक्ष्यांसाठी भांडं बनवून केली अन्न व पाण्याची सोय
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 26, 2020 5:11 PM
वनरक्षक पंकज कुंभार याने घरातील रिकाम्या डब्यापासून भांडे बनवून पक्षांची अन्न व पाण्याची सोय केली आहे.
ठळक मुद्देवनरक्षकाने पक्ष्यांसाठी बनविले अन्न व पाण्याचे भांडेपत्र्याच्या डब्यापासून तयार केले भांडेचिमणी, मैना व इतर अनेक पक्ष्यांचा वावर