वणव्यामुळे वनसंपदेचा -हास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:26 AM2018-03-30T02:26:51+5:302018-03-30T02:26:51+5:30
मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
दासगांव : मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान वाढल्याने वणवे लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लागणाऱ्या वणव्यांतून आगीच्या ज्वालांनी वातावरण आणखीनच तापले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच पशू-पक्ष्यांवर होत असून, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपासून दासगाव डोंगर भागात लागलेल्या वणव्यामुळे परिसरात उष्णतेत वाढ झाली आहे. हा वणवा विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.
कोकणातील बहुतांश गावे ही डोंगर कुशीमध्ये वसलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील वनसंपत्तीमुळे कोकणातील तापमान कायम कमी किंवा थंड राहिलेले आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. यामुळे कोकणातील तापमानाचा पाढा दिवसेंदिवस वाढू लागलेला दिसून येत आहे. त्यातच शेतकºयांच्या गैरसमजुतीतून आणि नैसर्गिकरीत्या वणवा लागण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.
एकीकडे शेतकरी परंपरागत पद्धतीतून भातशेती करण्यासाठी जंगलातील झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडून तरवा भाजण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वनसंपत्तीचा ºहास आणि वातावरणावरील परिणाम होत आहे. पूर्वीपासूनच्या डोंगरांना वणवा लावून गवत जाळण्याचे प्रमाणदेखील आजही कायम आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासूनच विविध ठिकाणी डोंगरात आगीचे लोट उठताना दिसतात.
शासकीय पातळीवर वणवा आणि तरवा भाजणीबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी वारंवार लागणारे वणव्यांचे प्रकार बघता शेतकºयांनी परंपरागत शेतीत बदल केला नसल्याचेच दिसून येत आहे. नेहमीच अशाच प्रकारे वणवा लागल्याने सध्या असलेल्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात असे वणवे लागण्याचे प्रकार होत आहेत. दासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी महामार्गालगतच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागला आहे. त्यात संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.