लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : विक्रमगड तालुक्यासह अनेक भागांत मार्च महिन्यात जंगलांना वणवे लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या लावल्या जाणाऱ्या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यप्राण्यांनादेखील याचा फटका बसून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तत्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मागील काही वर्षांपासून जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच ससे, रानडुक्कर, हरीण यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलांना आगी लावतात. मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आणि हे गवत उन्हात तापलेले असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरते आणि आटोक्यात आणणे कठीण बनते. यामुळे वणवा पसरून पूर्ण डोंगर जळून खाक होताे. आठ ते दहा वर्षांपूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैल, गायी, म्हशी, रेडे शेतकऱ्यांकडे असायचे. मात्र, आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गावाचा विचार केला तर २० ते २५ पाळीव जनावरे गावामध्ये आढळून येतात. पूर्वी ही सगळी जनावरे शेतकरी जंगलात चरायला नेत असत. त्यामुळे जंगलात गवताचे प्रमाण कमी राहत होते. तसेच उन्हाळ्यातदेखील गुरांना चारण्यासाठी गवत लागत असल्याने सहसा कोणी जंगलात आगी लावत नसे. मात्र, सध्या गुरेढोरे राहिली नसल्याने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यातच, काही शिकार करणारी समाजकंटक मंडळी जंगलाला आगी लावतात. त्यामुळे पूर्ण जंगल जळून राख होते. त्यामुळे काही प्रमाणात राहिलेल्या मुक्या जनावरांनादेखील खाण्यासाठी गवत उरत नसल्याने चाऱ्याच्या शोधात त्यांना रानोमाळ भटकावे लागते. या लावल्या जात असलेल्या वणव्यांमध्ये नवीन उगवलेली जंगली झाडांची रोपे जाळून खाक होतात.
सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवे लागल्याचे दिसून येत आहे. खरेतर, वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा जर या वणव्यांवर नियंत्रण आणणाऱ्या अत्याधुनिक सामग्री घेतल्यास जंगल मोठ्या प्रमाणात वाचेल. त्याचबरोबर आगी लावणाऱ्या समाजकंटकांवर वनविभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.- स्वप्नील ठाकरे, निसर्गप्रेमी