उल्हासनगर : बेकायदा बांधकामांमुळे बदनाम असलेल्या उल्हासनगरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींच्या मालमत्तेवरील नावात बदल केल्याप्रकरणी चौघांसह तत्कालीन पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पालिकेचे कर्मचारी असल्याने खळबळ उडाली असून परस्पर नावात बदल करणारी टोळीच मालमत्ता कर विभागात सक्रिय असल्याचा आरोप होत आहे. पोलीस चौकशीत मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता असल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं. १मधील सेंच्युरी कंपनी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन दुकानांचे बनावट कागदपत्रे जगदीश म्हसकर यांनी मेवालाल यादव या बनावट व्यक्तीच्या नावाने बनवले. जॉर्ज वॉल्टर याच्या मदतीने २३ मार्च २०१८ रोजी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदीखत लिहून घेतले. बनावट कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपरच्या आधारे महापालिका मालमत्ताकर विभागातून नाव बदलून घेतले. हा प्रकार दुकानमालक अनिल तरे यांना माहीत झाल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊ न तक्रार दिली; मात्र ही तक्रार घेतली नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिसांनी जगदीश म्हसकर, जॉर्ज वॉल्टर, जुन्या तारखेचे स्टॅम्प पुरवणारे व्हेंडर रमेश पाटील, स्टॅम्प पेपरवर बनावट नाव असलेला मेवालाल यादव यांच्यासह कागदपत्रांची शहानिशा न करता मालमत्तेच्या नावात बदल करणारे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकाराने पुन्हा महापालिका मालमत्ता विभाग पुन्हा वादात सापडला आहे. या प्रकाराने मालमत्ता कर विभागात कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता कोट्यवधींची मालमत्ता दुसºयाच्या नावाने करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
यापूर्वीही असे प्रकार घडले असून विभागाच्या उपायुक्तांसह इतर अधिकाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच गेल्या महिन्यात बँक आणि मॉल यांचे कर बिल शून्य करून महापालिकेचे तब्बल पाच कोटींचे नुकसान केल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवून चौकशीचे आदेश दिले. मात्र याप्रकरणी अद्याप संबंधितांवर कारवाई झालेली नाही.
पोलिसांच्या चौकशीनंतरच खुलासा - सोंडे
कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता कोट्यवधींची मालमत्ता दुसºयांच्या नावावर केल्याप्रकरणी पालिका अधिकारी आणि कर्मचाºयांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार गेल्या वर्षी घडला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतरच याबाबत सर्व खुलासा होऊ शकेल, असे मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त मदन सोंडे म्हणाले.