नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील भिवपुरी येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात प्रवेशद्वाराच्या जवळ संरक्षक कठडे बसविण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदारांनी मागील वर्षी भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या प्रशासनाला दिले होते. मात्र एमएमआरडीएने शालेय प्रशासनाला दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखवत शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पोटात अपघाताच्या भीतीचा गोळा कायम आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने कर्जत - कल्याण चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले. मात्र एमएमआरडीएने कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या गंभीर समस्येकडे एमएमआरडीएने दुर्लक्ष केल्यामुळे एमएमआरडीएविरोधात शाळेतील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.महानगर विकास प्राधिकरणाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण यंत्रणा उपलब्ध करावी, शाळेला संरक्षक कठडा बांधून द्यावा, अशी विनंती २०१४ मध्ये शालेय प्रशासनाने प्राधिकरणाला केली होती. परंतु प्राधिकरणाने शालेय प्रशासनाच्या विनंती पत्राकडे पाठ फिरवीत अपघाताला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (वार्ताहर)राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाच्या टेंडरमधील सर्व कामे एमएमआरडीएने केली आहेत. टेंडरच्या बाहेरील कामांसाठी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या संरक्षक भिंतीसाठी प्राधिकरणाच्या बांद्रा कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात येईल .- विनय सुर्वे, उपअभियंता, एमएमआरडीए
एमएमआरडीएला पडला संरक्षक भिंतीचा विसर
By admin | Published: June 29, 2015 10:29 PM