ठाणे – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी औरंगाबादमध्ये औरंगजेबाचं कबरीवर माथा टेकवल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपा-मनसेसह शिवसेनेनेही यावर भाष्य करत औवेसींना इशारा दिला आहे. औरंगाबादला माथा टेकवून त्यांनी त्यांचा तो हिरो असल्याचं दाखवून दिलं. हिंदुत्वासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन कालीचरण महाराजनं केले आहे.
ठाण्यात पत्रकारांशी कालीचरणनं संवाद साधला. त्यावेळी म्हणाले की, जे धर्मवीर आहेत ज्यांनी हिंदूंसाठी काम केलं आहे अशा लोकांसाठी हा चित्रपट येत असेल तर माझं सर्व प्रथम कर्तव्य आहे आणि यामधून मी लोकांना प्रोत्साहन करतो जे हिंदूंसाठी काम करतात त्यांना अधिक पाठिंबा मिळाला पाहिजे. प्रजा सर्व बघत आहे की नक्की हिंदुत्व रक्षण कोण करत आहे. प्रजेला सर्व माहित आहे. शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी राज्य स्थापन करण्याची गोष्ट केली. कधी भाषा स्थापनेची गोष्ट केली नाही. भाषा वाद, वर्ण वाद, प्रांत वादामुळे जातीय वादामुळे हिंदुत्वाचा नाश होत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पूर्वी जे काही घडलं त्यामुळे उत्तर भारतीय नागरिक नाराज आहेत जेव्हा आपण हिंदुत्व हातात घेतो तेव्हा सर्व भारतीयांनी एकत्र व्हावे. परंतु भाषेचा विषय घेतला तर सर्वच भाषा वेगळ्या होतील. राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे त्यामुळे मी मात्र त्यांना समर्थन करत आहे. औरंगाबादला माथा टेकवून त्यांनी त्यांचा तो हिरो असल्याचं दाखवून दिलं आपण हिंदू अनेक वादात अडकून बसला आहे. आपण सगळे वाद सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र झालं पाहिजे तेव्हा हिंदुत्व टिकेल हे आताच्या नेत्यांना कळलं पाहिजे असंही कालीचरणने सांगितले.
महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण - शिवसेना
"संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला. त्याला कधीच यश मिळालं नाही. औरंगजेब काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सगळं सांगेल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. जे औरंगजेबाचं झालं तेच त्याच्या भक्तांचंही होईल" असा घणाघात संजय राऊत यांनी केला.