डोंबिवली: महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....च्या जयघोषात डोंबिवलीत अनेक ठिकाणी स्वामी जयंतिचा सोहळा संपन्न झाला. नांदीवली मठात मात्र दुस-या दिवशी मंगळवारीही स्वामींच्या मठात ‘जोगवा’ म्हंटला गेला. मठाच्या परंपरेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला आदीमाया आदीशक्ती रुप परिधान करण्यात आले होते. ते रुप याची देही याची डोळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो महिलांनी तुडुंब गर्दी केली होती. मंडळाच्या संस्थापिका सुषमा लिमये यांनी ‘आईचा जोगवा जोगवा मागेन’ म्हणुन सगळयांना स्वामींनी उदंड आयुष्य द्यावे अशी प्रार्थना केली.जोगवा म्हणण्यासाठी मंडळाच्या अनुबोध महिला भजनी मंडळाच्या सेवेक-यांनी साथ दिली. आईचा जोगवा जोगवा मागेन... असे म्हणतांना महिला दंग झाल्या होत्या. त्यातच स्वामींचे आदीमाया आदीशक्ती हे लोभसवाणे रुप उपस्थितांना आकर्षून घेत होते. सकाळी ११.३० वाजता सुरु झालेला जोगवा दुपारी एकच्या सुमारास संपला. त्यानंतर महिलांनी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली. कोणी त्या रुपाचे फोटो घेत होते, तर कुणी सेल्फी काढण्यात दंग होते. अबालवृद्ध महिलांची विशेष उपस्थिती होती. सगळयांचे दर्शन झाल्यावर महाप्रसादाची सुविधा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरु होती. त्यानंतर घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी स्वामी नाम जप करुन निवडलेल्या तांदळाचा प्रसाद आलेल्या प्रत्येक महिला भक्तांना देण्यात आला. भक्तांनीही तो तांदळाचा प्रसाद उदंड उदंड म्हणत घेतला.त्यानंतर अनुबोध आणि पुरुषोत्तम भजनी मंडळाने स्वामीसमोर संगित सेवा सादर केली. संध्याकाळी काल्याचे किर्तन झाले, त्यानंतर ६ वाजता स्वामींची आरती झाल्यानंतर निर्गुण पादुकांची पालखी नांदिवली येथून निघाली. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास मंडळाच्या रेल्वे स्थानक परिसरातील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मंदिर परिसरात पालखीची सांगता झाली. त्यादरम्यान सेवेक-यांनी रिंगण करत स्वामी नामाचा सामुहीक जप केला. तर नाचू गावू आनंदे स्वामी समर्थ... यासह मुखी नाम घ्यावे स्वामी समर्थांचे... अशी स्वामींची अनेक भजने म्हणत रिंगणातच ठेका धरत नाच केला. ढोलकी आणि झांजच्या तालावर रिंगणामधील स्वामी भक्तांचा सोहळा बघतांना डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले.