मीरारोड -
मीरा भाईंदर महापालिकेत सध्या पदोन्नती साठी सध्या अधिकारी - कर्मचारी यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. त्यातूनच काहींना पदोन्नती तर प्रभारी पदोन्नती रद्द करून पदावनती करण्याचा खेळ रंगला आहे. पदोन्नती मिळालेले खुश तर पदोन्नती न मिळालेले आणि पदोन्नती देऊन ती रद्द झालेले अधिकारी कर्मचारी नाखूष अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या आस्थापना वरील कायम अधिकारी व कर्मचारी यांच्या स्थायित्वाचा दाखला , सेवा पुस्तिका आदी अत्यावश्यक बाबी अनेक वर्षां पासून रखडलेल्या होत्या. शिवाय पूर्वी दिलेल्या तदर्थ पदोन्नत्या देखील वादग्रस्त ठरल्या . तर पात्रता असून सुद्धा पदोन्नती दिली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी देखील होती. पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची सुपारी देण्यात अटक झालेले कनिष्ठ अभियंता यशवंतराव देशमुख व श्रीकृष्ण मोहिते यांच्या तपासात सुपारी देण्या मागे पदोन्नतीत डावलले जाणे व कामातील हस्तक्षेप आदी मुद्दे प्रामुख्याने समोर आले.
कर्मचाऱ्यांचा स्थायित्वाचा दाखला , सेवा पुस्तिका आदी वर्षा न वर्ष प्रलंबित कामे आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेश नुसार मार्गी लावण्यात येऊन पदोन्नती दिली जात असल्याचे आस्थापना विभागाचा कार्यभार सांभाळणारे उपायुक्त मारुती गायकवाड सांगतात. पदोन्नती साठी काहींची मोर्चेबांधणी सुरु आहे . गेल्या काही महिन्यात काही अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर आयुक्त ढोले यांनी २० ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशाने उपायुक्त पदी स्वप्नील सावंत यांना दिलेली प्रभारी पद्धतीची पदोन्नती आता मार्च मध्ये ढोले यांनीच रद्द केली आहे. सावंत यांना पदावनत करून त्यांना पुन्हा सहायक आयुक्त केले आहे. लाच घेतल्याचा गुन्हा दाखल असताना सावंत याना प्रभारी पदोन्नती दिल्याचा आरोप अन्य काही तसेच उपायुक्त पदा साठी इच्छूक अधिकाऱ्यांनी चालवला होता. तसेच शासना कडून आणखी एक उपायुक्त दिल्याने सावंत त्या पदावरून पायउतार झाले.
तर आयुक्तांनी आता आणखी काही जणांना पदोन्नती दिली आहे. स्वच्छता निरीक्षक पदावर कार्यरत असणारे नीळकंठ उदावंत व विजयकुमार पाटील यांना स्वच्छता अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. परिचारिका या पदावर कार्यरत असणाऱ्या. मीना तेरडे व ज्योती सातवे यांना परिसेविका या पदावर तर कक्षसेवक पदावर असणारे दिपक राऊत यांना. शस्त्रक्रिया गृहपरिचर या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
उद्यान अधिक्षक पदावर कार्यरत असणारे नागेश वीरकर व हंसराज मेश्राम यांना उप मुख्य उद्यान अधिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर पाणी पुरवठा विभागात उप अभियंता पदावर कार्यरत असणारे किरण राठोड व शरद नानेगावकर यांना कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) या पदावर पदोन्नती देण्यात आली. आधीच पाणी पुरवठा विभागात सुरेश वाकोडे हे कार्यकारी अभियंता पदी आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा ह्या एकाच विभागात आणखी २ असे एकूण ३ कार्यकारी अभियंता असणार आहेत. दुसरीकडे कामाची व आर्थिक तरतुदीची मोठी व्याप्ती असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा भार मात्र एकट्या दीपक खांबित ह्या कार्यकारी अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे . त्यावरून बांधकाम विभागाचे आयुक्त दरबारी असलेले वजन चर्चेचा विषय ठरला आहे.