बोर्डी: डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारे (रा. तलासरी) यांचे सोमवार 12 एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गुजरातच्या वापी जिल्ह्यातील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खलावल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. तेथेच त्यांचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.2014 साली डहाणू विधानसभा मतदार संघातून ते भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व असताना, मोदी लाटेत प्रथमच भाजपला येथे विजय मिळवता आला होता. ते या पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष होते. रविवार, 11 एप्रिल रोजी भाजप जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला. ते तलासरी तालुक्यातील रहिवासी होते. एका पाठोपाठ आदिवासी नेत्यांच्या मृत्यूमुळे भाजप आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डहाणूचे माजी भाजप आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 10:42 AM