मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचा माजी पदाधिकारी निहाल एजाज खान ( वय ३६ वर्षे ) रा . मुन्शी कंपाउंड , काशीमीरा ह्याला गांजा विकताना मीरारोड पोलिसांनी अटक केली असून त्याच्या सह तरुणीला सुद्धा पकडले आहे . दोघांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. गाडी मधून फिरून गांजा विक्री करायचा व गांजा वजन करण्यासाठी तराजू गाडीत ठेवायचा .
मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असताना शिवार उद्यान येथील सरदार वल्लभाई पटेल शाळेच्या मार्गावर ३ मे च्या रात्री ७ च्या सुमारास निहाल हा एका गाडीच्या आडोशाला संशयास्पदरित्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसून आला.
देवकर यांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला असतानाच त्याला पकडले . त्यावेळी त्याच्या मारुती एर्टिगा एमएच ०४ केएल ३६३२ ह्या गाडीत बसलेली तरुणी पळून गेली . पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या कडे लहान प्लास्टिक पिशव्यां मध्ये विक्रीसाठी भरलेला सुमारे ८०० ग्राम गांजा तर एका पिशवीत ७६५ ग्राम गांजा सापडला . शिवाय २ मोबाईल , गांजा मापण्यासाठी वजन काटा , ४ हजार ३०० रोख , प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी त्याच्या ४ लाख किमतीच्या गाडी सह गांजा , मोबाईल , वजन काटा ,रोख आदी सर्व जप्त केला . निहालच्या चौकशी नंतर पोलिसांनी गाडीतून पळून गेलेल्या सपना उर्फ शायदा सियासत खान ( २६ ) रा . मुन्शी कंपाउंड हिला देखील अटक करून दोघांवर ४ मे रोजी अमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
निहाल हा भाजपाचा माजी युवा जिल्हा सचिव असून सपना ही त्याची सावत्र मुलगी आहे . तिच्यावर ह्या आधी देखील अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे . निहाल व सपना ह्या दोघांना ठाणे न्यायालयाने ८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे . सहायक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. निहाल जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट चा अध्यक्ष आहे . तसेच अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चा तो महाराष्ट्राचा सहसचिव म्हणवतो . भाईंदर येथे पत्रकार सांगून अनधिकृत बांधकामात खंडणी उकळणाऱ्या भाजपाचा पदाधिकारी संजय ठाकूर विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्यास अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी अटक कारण्यात आली आहे .