ठाणे- ठाणे काँग्रेसचे पहिले आमदार ठरलेले कांती कोळी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने ठाणे काँग्रेसला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उद्या दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
१९८० ते ९० या दशकात ते सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच आमदार होण्यापूर्वी त्यांनी नगरसेवक पदही भूषविले होते. मधल्या काळात त्यांनी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदही भूषविले होते. ठाणे काँग्रेसला वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. याशिवाय कोळी समाजाला न्याय देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मनमिळावू असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं, आनंद दिघे यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने ठाणे कॉंग्रेसमध्ये आणि एकूणच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.