--------------
नामकरणाच्या वादात ‘वंचित’ची उडी
डोंबिवली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद पेटला असताना विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजता पूर्वेतील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. विमानतळासाठी तेथील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्या लढ्यात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. त्यामुळे पक्षाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. या प्रमुख मागणीसाठी आज आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी दिली.
---------------------
कोरोनाचे नवे ८९ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी नव्या ८९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. १५४ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे, तर दोनजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या एक हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३५ हजार १४२ रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३१ हजार २१६ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
--------------------