ठाणे : शिवसेना उपशहरप्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास ढमाले यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. अवयव दान मोहीम त्यांनी ठाण्यात यशस्वी राबविली होती.
ठाण्याच्या जांभळीनाका परिसरात गेल्या ५० वर्षांपासून त्यांचे वास्तव्य होते. त्यांचे वडील सहदेव बाबूराव ढमाले हेदेखील सलग दोन वेळा पालिका निवडणुकीत निवडून आले होते, त्यामुळे ढमाले यांच्या कुटुंबियांत राजकीय वारसा असल्याने शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या सहवासात विलास यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
ठाण्यात गतिमंद मुलांसाठी त्यांनी पहिला दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. अवयव दान मोहिमेची सुरुवात त्यांनीच केली होती. गेल्या काही वर्षांपासून मधुमेह आणि किडनीच्या आजाराने त्यांना ग्रासले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सुना,भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे.