बदलापूर - अंबरनाथ नगरपालिकेतील पहिले उपनगराध्यक्ष प्रदीप खानविलकर यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या मृत्यू ओढवला आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. मात्र चाचणीचा अहवाल न आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास विलंब झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री बदलापुरात घडला आहे. अंबरनाथ नगरपालिकेची पुनर्स्थापना झाल्यावर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून काम सांभाळणाऱ्या अभ्यासु नगरसेवक प्रदीप खानविलकर यांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभर खानविलकर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांची पालिकेमार्फत कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ते बदलापूरला आपल्या घरी निघून गेले. सायंकाळी पुन्हा त्यांना त्रास जाणवल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र कोरोनाचा अहवाल नसल्याने कोणतेच रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार नव्हते, त्यातच त्यांच्या घरी मृत्यू झाला.खानविलकर यांच्यासोबत सोमवारी दिवसभर अंबरनाथ मधील उपशहर प्रमुख बाळा राऊत हेदेखील उपचारासाठी भटकंती करीत होते. खानविलकर यांचा कोरोना टेस्ट अहवाल न आल्याने त्यांना कोणत्याच रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले आणि आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. सायंकाळी पुन्हा त्रास सुरू झाल्यावर खानविलकर यांनी रुग्णालयात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेस देखील कोरोना चा अहवाल आड आल्याने ते घरीच बसून राहिले आणि त्याच दरम्यान त्यांच्या घरात मृत्यूशी झुंज सुरू झाला. घरात हृदयविकाराचा झटका आल्यासारखा वाटल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. खानविलकर यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला की कोरोनामुळे झाला ही बाब गौण असली तरी त्यांची इच्छा असताना देखील त्यांना रुग्णालयात उपचार मिळू शकला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अंबरनाथ मध्ये या 2 दिवसात उपचार न मिळाल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोणा चे लक्षण असलेल्या परंतु कोरोना टेस्ट प्राप्त न झालेल्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी शहरात सस्पेक्टेड रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे
अंबरनाथच्या माजी उपनगराध्यक्षांचा बदलापूरमध्ये उपचारांअभावी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 6:08 PM